संपादक- गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.
दि.११ सप्टेंबर २०२६.
: तडीपारीचा आदेश असतानाही बारामती शहरात प्रवेश करून फॉर्च्युनर वाहनातून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अक्षय उर्फ सोन्या भिमराव कांबळे याच्याविरुद्ध बारामती
शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. समाजमाध्यमावर प्रसारित झालेल्या चित्रफितीची पोलिसांनी स्वतःहून दखल घेत ही कारवाई केली.
८ सप्टेंबर रोजी समाजमाध्यमावर प्रसारित झालेल्या चित्रफितीत एमएच-४२-बीएन-९७८६ क्रमांकाच्या फॉर्च्युनर वाहनाच्या टपावर तसेच बाहेरील भागावर काही जण बसलेले दिसून आले. यातील काही जण नागरिकांकडे हातवारे करीत असल्याचेही चित्रफितीत दिसत होते. पोलिसांनी चित्रफितीची पडताळणी केली असता त्यामध्ये अक्षय उर्फ सोन्या कांबळे असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. कांबळे याला १८ जानेवारी २०२५ ते १७ जानेवारी २०२७ या कालावधीसाठी पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच फलटण तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीचा आदेश लागू असतानाही बारामती शहरात प्रवेश केल्याचे समोर आल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिस शिपाई गिरीश नेवसे यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिस ठाणे, बारामती येथे गुन्हा क्रमांक ३७२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८१, २८५ तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत स्वतंत्र कारवाईही सुरू आहे. कांबळेविरुद्ध यापूर्वीही खुनाचा प्रयत्न, मारहाण व दहशत निर्माण करण्यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, धीरज पडकर, अमोल कांबळे, तुषार उर्फ चिंट्या सोनवणे, अक्षय उर्फ सोन्या कांबळे, वैभव बगाडे, अक्षय सोनवणे व निलेश उमरदंड या तडीपार व्यक्तींच्या हालचालींवरही पोलिसांनी लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
ही कारवाई प्रभारी पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत इंगवले, पोलिस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर, यशवंत पवार, उदय टापरे, रामचंद्र शिंदे, पोलिस शिपाई गिरीश नेवसे, अक्षय सीताफ व महिला पोलिस शिपाई भाग्यश्री देवकाते यांच्या पथकाने केली.








