बारामतीत बिनविरोधसाठी प्रत्येकी २० लाख दिले, उमेदवार फोडले – युगेंद्र पवारांचा अजित पवार गटावर आरोप


संपादक – गणेश जाधव

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षाने निवडणुकीच्या आधीच गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे. अनेक नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये सत्ताधारी पक्षाचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

बारामती नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे नगरसेवक पदाचे 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे निवडणुकीपूर्वीच अजित पवार गटाने नगरपालिका निवडणुकीत आघाडी घेतली आहे. बारामतीमध्ये अजित पवार गटाकडून विरोधीपक्षाच्या उमेदवारांना 20-20 लाख रुपये देण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी केला आहे.

बारामती नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीपासून बारामतीमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना सुरु झाला. बारामती नगरपालिका निवडणुकीत दोन्ही पवार एकत्र येणार अशी चर्चा होती, अखेर दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार मैदानात उतरवले आणि पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा हवेत विरल्या. दरम्यान अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ने आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आणले. यावरुन आता शरद पवार गटाकडून गंभीर आरोप केले जात आहेत.

शरद पवार गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार म्हणाले की, अजित पवार गटाकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. आम्ही असेही ऐकले की एका उमेदवाराला 20-20 लाख रुपये देण्यात आले. नगरसेवक पदासाठी उभे असलेले उमेदवार हे गरीब कुटुंबातील आहेत. त्यांनी आयुष्यात कधी 20 लाख रुपये ऐकत्र पाहिले नसतील. ऐवढे पैसे कमावण्यासाठी त्यांना किती काळ लागला असता, तेवढे पैसे त्यांना देऊ केले, अशी आमच्याकडे माहिती आहे, असे युगेंद्र पवार म्हणाले.

बारामतीत नगराध्यक्षपदासाठी 14 तर नगरसेवक पदासाठी 165 उमेदवार रिंगणात आहेत. बारामती नगरपालिकेत एकूण 41 जागांसाठी निवडणूक होत आहे, त्यापैकी 8 जागांवर अजित पवार गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केलेल्या 77 उमेदवारी अर्ज मागे घेतले तर नगराध्यक्षपदासाठी दोघांनी उमेदवारी मागे घेतली.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!