संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरात जमिनीच्या वादातून एका तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह चार जणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जमिनीच्या वादातून तरुणाचं अपहरण
ही घटना 22 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. फिर्यादी संदीप गोरख होळकर, रा. सदोबाचीवाडी, हे वडगाव निंबाळकर येथील एका हॉटेलसमोर उभे असताना आरोपी तेथे आले. त्यांनी संदीप यांना बळजबरीने पांढऱ्या रंगाच्या स्वीफ्ट कारमध्ये बसवले आणि अपहरण करून पळवून नेले. जमिनीच्या वादातून निर्माण झालेल्या रागातून मुख्य आरोपी तेजस ऊर्फ बंटी होळकर याने आपल्या साथीदारांच्या मदतीने संदीप यांना मावळ तालुक्यातील उर्से येथील एका उसाच्या शेतात नेले.
त्या ठिकाणी आरोपींनी संदीप यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. मारहाण सुरू असतानाच आरोपी बंटी होळकर याने फरार आरोपी शंभू कारंडे याला व्हिडिओ कॉल करून संदीप यांना होत असलेली मारहाण थेट दाखवली. तसेच आमच्या नादाला लागलास तर जिवे मारू, अशी धमकी देण्यात आली. मारहाणीनंतर संदीप यांना दारू पाजून जखमी अवस्थेत बारामतीतील होळ परिसरात सोडून आरोपी फरार झाले.
घटनेनंतर वडगाव निंबाळकर पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तेजस होळकर, साहिल गायकवाड, संकेत भिसे आणि सनी सकट या चार आरोपींना अटक करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेली कार आणि लाकडी दांडके पोलिसांनी जप्त केली आहेत. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.








