बारामतीत अवैध धंद्यांविरोधातील बेमुदत उपोषणाचा १५ वा दिवस, तरीही प्रशासनाला जाग येईना, नागरिक संतप्त


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – बारामती शहर व तालुक्यात खुलेआम सुरू असलेल्या बेकायदेशीर अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला आज पंधरा दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र एवढा दीर्घ काळ लोटूनही पोलीस प्रशासन व संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि इच्छाशक्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मटका, जुगार अड्डे, ऑनलाइन लॉटरी, गांजा, ताडी, हातभट्टी, गुटखा विक्री यांसारखे अवैध धंदे शहर व तालुक्यात जोरात सुरू असतानाही “धंदे बंद आहेत” अशी कागदी पत्रे देऊन प्रशासनाने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात मात्र या अवैध धंद्यांचे जाळे अधिकच विस्तारत असल्याचे चित्र आहे.

उपोषणकर्त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असताना देखील प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. जनतेच्या आरोग्याशी, तरुणांच्या भवितव्याशी आणि कायदा-सुव्यवस्थेशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा संताप नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

“दगडाला पाझर फुटेल पण प्रशासनाला नाही” अशी परिस्थिती निर्माण झाली असून, अवैध धंद्यांना अभय देणारे कोण आहेत, हफ्ता वसुलीचे सूत्रधार कोण, याची सखोल चौकशी होणार की नाही, असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे.

जर लवकरात लवकर ठोस कारवाई झाली नाही, तर हे उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

बारामतीतील शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या अवैध धंद्यांविरोधात प्रशासन कधी जागे होणार, की एखादी दुर्दैवी घटना घडल्यावरच हालचाल होणार? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!