संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
राज्यातील बारावी परीक्षेला यंदा पेपरफुटीच्या आरोपांमुळे आधीच धक्का बसलेला असताना, आता सीलबंद लिफाफ्यातूनच प्रश्नपत्रिका कमी आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
विज्ञान शाखेच्या फिजिक्स, केमिस्ट्री, गणित आणि बायोलॉजी विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये २५ ऐवजी २४ प्रती आढळल्याची तक्रार अनेक परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षकांनी केली आहे. या प्रकारामुळे परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
परीक्षेच्या दिवशी प्रेसमधून सीलबंद पाकिटे थेट केंद्रांवर पाठवली जातात. मात्र काही केंद्रांवर लिफाफा उघडताच एक प्रश्नपत्रिका कमी असल्याचे निदर्शनास आले. पर्यवेक्षकांनी तत्काळ केंद्रप्रमुखांना याची माहिती दिली. संबंधित अहवाल तयार करून तो महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाकडे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) पाठविण्यात आला आहे. बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचा दुजोरा दिला आहे.
विशेष म्हणजे, विज्ञान शाखेच्या प्रश्नपत्रिकांमध्येच ही तफावत आढळल्याने ‘कुठेतरी पाणी मुरतेय’ अशी चर्चा शिक्षण क्षेत्रात रंगू लागली आहे. या घटनेचा अलीकडील पेपरफुटी प्रकरणाशी काही संबंध आहे का, याबाबत संशयाचे सावट गडद झाले आहे.
दरम्यान, पेपरफुटी प्रकरणात आधीच चार जणांना अटक करण्यात आली आहे. शिक्षक निशिकांत मून यांच्यासह ‘एक्सेलन्ट अकादमी’चे मुस्तफा खान आणि जुनेद जावेद यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. एका विद्यार्थ्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पाच सदस्यांचे विशेष तपास पथक कार्यरत आहे.
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. १८ फेब्रुवारीला प्रकार उघडकीस आल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. काही आरोपींनी मोबाईलमधील डेटा फॉरमॅट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या तपास पथकाने डिलिट केलेला डेटा पुनर्प्राप्त करण्यात यश मिळवले. त्यातून २१ फेब्रुवारीला गणिताचा तिसरा पेपर डिजिटल माध्यमातून प्रसारित झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. म्हणजेच गुन्हा दाखल झाल्यानंतरही पेपर फुटल्याचे स्पष्ट होत आहे.
यापूर्वी उर्सुला स्कूल(Ursula School) येथे एका विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये १६ फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि १८ फेब्रुवारीला भौतिकशास्त्राचा पेपर प्रसारित झाल्याचे आढळले होते. आता गणिताचाही पेपर फुटल्याचे उघड झाल्याने हे संघटित रॅकेट असल्याची शक्यता अधिक बळावली आहे.
सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका कमी येणे आणि डिजिटल माध्यमातून पेपर प्रसारित होणे या दोन्ही घटना एकाच काळात समोर आल्याने परीक्षा व्यवस्थेतील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे का, याचा उलगडा तपासानंतरच होणार असला तरी विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढली आहे.
दरम्यान, शिक्षण मंडळाकडून वितरण प्रक्रियेचा आणि मुद्रण यंत्रणेचा सखोल आढावा घेतला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्य सूत्रधाराच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.









