संपादक – गणेश जाधव
बारामती:- महाराष्ट्रातील सर्व शाळा 5 डिसेंबर रोजी बंद राहणार आहेत. राज्यातील (Breaking News) शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी या (Teachers Protest) दिवशी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे.
हे आंदोलन मुख्यतः शिक्षक पात्रता परीक्षा TET सक्ती रद्द करण्यासाठी, 15 मार्च 2024 चा संचमान्यता संदर्भातील शासन निर्णय मागे घेण्यासाठी आणि शिक्षकांच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे सरकारी, अनुदानित आणि खासगी अशा सर्व प्रकारच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा एका दिवसासाठी बंद राहतील.
पुण्यात पार पडलेल्या बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाने आंदोलनाचा निर्णय जाहीर केला. 5 डिसेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक भारती, मुख्याध्यापक महामंडळ, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना आणि इतर 100 पेक्षा जास्त संघटना सहभागी होणार आहेत.
शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना TET परीक्षा अनिवार्य न करणे, संचमान्यता जुन्या निकषानुसार देणे, शिक्षणसेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करणे यांचा समावेश आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या मागण्या प्रलंबित आहेत. वारंवार घातलेल्या पाठपुराव्यानंतरही निर्णय न झाल्याने संघटनांनी संप आणि शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला होता.
5 डिसेंबरच्या या आंदोलनामुळे राज्यातील शिक्षण व्यवस्था एका दिवसासाठी ठप्प राहणार आहे. मोठ्या प्रमाणावर शिक्षक सहभागी होण्याची शक्यता आहे. संघटनांचे म्हणणे आहे की सरकारने तातडीने त्यांच्या मागण्यांवर निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा विचार केला जाईल.








