बारामती विधानसभा अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; ३ लाख ८३ हजारांवर मतदार


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने यांनी

बारामती (२०१) विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण करून अंतिम मतदार यादी मंगळवारी (ता.१०) प्रसिद्ध करण्यात आली.

या अंतिम यादीनुसार मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी झाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

त्यानुसार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. यानंतर ९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या. प्राप्त अर्जांची छाननी करून आवश्यक दुरुस्त्या केल्यानंतर अंतिम मतदार यादी १० मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली.

अंतिम यादीनुसार पुरुष मतदारांची संख्या १ लाख ९३ हजार ४९६, महिला मतदारांची संख्या १ लाख ९० हजार २७१, तर इतर मतदारांची संख्या २४ असून एकूण मतदारसंख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी आहे.

यापूर्वी २० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत एकूण मतदारसंख्या ३ लाख ६० हजार ६०८ इतकी होती. तर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत ३ लाख ८८ हजार ३७१ मतदारांची नोंद होती.

सदर अंतिम मतदार यादी नागरिक व राजकीय पक्षांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील तरतुदीनुसार १५ दिवसांच्या आत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांच्याकडे अपील दाखल करता येईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी दिली.

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!