बारामतीत सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टँकचा स्फोट; दोन मुलांसह तीन जण जखमी!


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – बारामती शहरातील कसबा परिसरातील साठेनगर येथे सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टँकचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत जीवितहानी टळली असली तरी तीन जण गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे.

त्यांच्यावर बारामती शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सेफ्टी टँकची नियमित साफसफाई न झाल्याने त्यामध्ये ज्वलनशील वायू साचून स्फोट झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे नगरपरिषदेच्या सार्वजनिक सुविधांच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काल रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली यामध्ये एका महिलेच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली असून दोन लहान मुले देखील जखमी झाले आहेत. या तिघांनाही तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, युवा नेते युगेंद्र पवार यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सार्वजनिक ठिकाणांच्या देखभालीत कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून, सार्वजनिक सुविधांची नियमित देखभाल आणि सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!