संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती येथे जानेवारी महिन्यात घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले आहे.
कर्नाटकातील बंगळुरू येथील शेषाद्रीपुरम पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर’ नोंदवण्यात आली आहे.
ही दुर्घटना २८ जानेवारी २०२६रोजी सकाळी सुमारे ८.४३ ते ८.४५ वाजण्याच्या दरम्यान घडली होती. मुंबईहून बारामतीकडे येणारे बॉम्बार्डियर लियरजेट ४५ विमान बारामती विमानतळाजवळ कोसळले. या अपघातात विमानातील सर्व पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश होता, ज्यामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती.
या प्रकरणात सुरुवातीला स्थानिक पोलीस ठाण्यांकडून गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात आला. रोहित पवार यांनी २५ फेब्रुवारी रोजी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे तसेच २६ फेब्रुवारी रोजी बारामती पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यानंतर पुणे सीआयडीकडून केवळ अपघाती मृत्यू म्हणून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले होते.
दरम्यान, विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करताना रोहित पवार यांनी प्रशासनावर टीका केली होती. किरकोळ चोरीच्या घटनांमध्येही गुन्हे दाखल होतात, मात्र इतक्या मोठ्या दुर्घटनेत गुन्हा दाखल होत नसल्याचे त्यांनी नमूद केले होते.तक्रारीनुसार, ही दुर्घटना केवळ अपघात नसून एक मोठा गुन्हेगारी कट असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विमानाच्या सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन, बनावट कागदपत्रे तयार करणे, तसेच देखभाल आणि ऑपरेशनमध्ये गंभीर निष्काळजीपणा झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या २४ फेब्रुवारी रोजीच्या सुरक्षा अहवालातही संबंधित कंपनीच्या काही विमानांमध्ये त्रुटी आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची काही विमाने उड्डाणासाठी अयोग्य ठरवून ग्राउंड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातग्रस्त विमानाने सुमारे ४९१५ उड्डाण तास पूर्ण केले होते, जे ५००० तासांच्या ‘टाइम बिफोर ओव्हरहॉल’ मर्यादेच्या जवळ होते. तरीही विमानाचा व्यावसायिक वापर सुरू ठेवण्यात आला होता, ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचे तक्रारीत नमूद आहे.या प्रकरणी आता अधिकृत गुन्हा दाखल झाल्याने तपासाला वेग येण्याची शक्यता असून, या दुर्घटनेमागील सत्य समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









