संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती- (30 मार्च) साखर कारखान्यातून ऊसतोडणी मजुरांना घेऊन जाणारी मालमाहू ट्रक १०० फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात १३ कामगार जखमी झाले असून, त्यातील सात जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही घटना गौताळा अभयारण्याच्या परिसरातील कन्नड-नागद मार्गावरील म्हैसघाट येथे रविवारी सकाळी घडला.
बारामती साखर कारखान्यातून ऊसतोडणी मजूरांना घेऊन सोयगाव तालुक्यातील दस्तापूर येथे जात असलेला आयशर ट्रक अचानक ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित झाला. घाटात वाहनाने संरक्षक भिंत तोडत दोन ते तीन पलट्या घेत सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळला.
या संदर्भात कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मोबाईलवरून अपघाताची माहिती मिळाली. तात्काळ हवालदार बाबासाहेब धनुरे, रवींद्र ठाकूर, प्रदीप पवार यांच्यासह घटनास्थळी पवार रवाना झाले. दरम्यान, युवक तसेच पप्पू पाटील, मोहसीन शेख, कमल गायकवाड, संजय बोरसे, भीमराव रावण, भूषण अहिरे, गुणवाण गोपाळ, मुकेश कापे, बापू जगताप, जगदीश निकुंभ, मोहसीन पठाण, महेंद्र वाघ आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना दरीतून बाहेर काढण्यास मदत केली.
अपघात होत असल्याने चालकाने प्रसंगावधान राखत ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच सर्वांना उडी मारण्यास सांगितले. त्यानुसार सलीम जमाल तडवी (३५) आणि प्रवीण बापू वाघ (३०) यांनी तत्काळ उडी मारून जीव वाचवला. वाहनात एक बकरा, दोन बकऱ्या तसेच मजुरांचे घरगुती साहित्यही होते.
पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी दोरखंड आणि चादरींच्या सहाय्याने जखमींना दरीतून बाहेर काढले. या अपघातात वंदना अशोक अंभोरे, रुकसाना सलीम तडवी (१७), दिव्या हिरामण पगारे (१७), सोनीबाई सलीम तडवी (३०), रंजनाबाई हिरामण पगारे (३०), मनीषा प्रवीण वाघ (२५), ममता प्रवीण वाघ (१ वर्ष) यांना डोके, कंबर व छातीला गंभीर दुखापत झाली असून हाडं माेडल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. सर्वांना प्रथम कन्नड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.
इतर जखमींमध्ये चालक महेश अरुण अंदूरे (३३), आशा सुखदेव पगारे (४५), कोमल हिरालाल पगारे (८), ऋतिक प्रवीण वाघ (४), प्रवीण बापू वाघ (३०), सलीम जमाल तडवी (३५) यांचा समावेश असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर कन्नड ग्रामीण रुग्णालयात डॉ. रुकसाना खान, डॉ. प्रवीण पवार तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध गायकवाड यांनी उपचार केले.









