मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतलंय.., सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – अजित पवार यांच्या निधनाला दोन महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी भावनिक पोस्ट शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दैनंदिन कामकाजात आजही त्यांची उणीव जाणवत असते, असं पोस्टमध्ये सुनेत्रा पवारांनी नमूद केलंय.

राज्याचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज दोन महिने पूर्ण झाले असून, त्यांच्या आठवणींनी कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांचे मन आजही भावूक झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक भावनिक पोस्ट लिहत अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. काळ पुढे सरकत असला तरी मन मात्र अजूनही त्यांच्या सहवासातच अडकून आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये दैनंदिन राजकीय आणि सामाजिक कामकाज करताना अजित पवार यांची उणीव सतत जाणवत असल्याचे सांगितले.

दादा, आज तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिले आहे. प्रत्येक क्षणी तुमची उणीव प्रकर्षाने जाणवते आणि त्याचवेळी दैनंदिन राजकीय व सामाजिक कामकाजात तुमचे अस्तित्वही जाणवत राहते. तुमच्यातील लोकाभिमुख – विकासाभिमुख व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांशी असलेली जिव्हाळ्याची नाळ, कामासाठीची झपाटलेली वृत्ती आणि प्रत्येक निर्णयामागची दूरदृष्टी हे सगळेच मला कायम मार्गदर्शन करण्याचे काम करतील. तुम्ही केवळ एक नेते नव्हता, तर असंख्य लोकांच्या आयुष्यात विश्वास, बळ आणि आशा निर्माण करणारे आधारस्तंभ होता. तुमच्यामुळे अनेकांना दिशा मिळाली, संधी मिळाली आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद मिळाली. असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!