संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – (4 एप्रिल )बारामती विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सोमवारी (६ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आतापर्यंत १७ जणांनी अर्ज दाखल केले असून, काँग्रेसकडून उमेदवार उभा केला जाणार की नाही, याबाबत अद्याप संभ्रमावस्था आहे.
मात्र, सातत्याने निवडणूक लढविणारे,’बिग बॉस’ मराठीतील अभिजित बिचुकले यांनी अर्ज भरला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सोमवारी अर्ज दाखल करणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीतील पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. आतापर्यंत १७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये साताऱ्यातील अभिजित बिचुकले यांचा समावेश आहे. याशिवाय जतमधील सतीश कदम यांनी हिंदुस्तान जनता पार्टी या पक्षाकडून, सांगोल्यातील राघू घुटूकडे यांनी न्यू राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने आणि राष्ट्रीय किसान बहुजन पक्षाकडून धाराशिव येथील अरुण निटुरे यांनी उमेदवारीअर्ज दाखल केला आहे. साताऱ्यातील शरद भिसे आणि संदीप खरात, बुलडाणा येथील गजानन गवळी, उल्हासनगर येथील त्रिशला कांबळे, ठाण्यातील दिलीप अलोनी, सोलापूरमधील दत्तात्रय बेदरे आणि रज्जाक उर्फ अब्दुलरौफ मुलानी, बारामतीतून मिथुन अटोळे, संकेत गावडे, दादा थोरात अभिजित कांंबळे आणि विलास होळकर, अहिल्यानगर येथील अनिल तुपे यांनी अपक्ष उमेदवारीअर्ज भरले आहेत.
दरम्यान, पोटनिवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. जनरल निरीक्षक विद्यानंद सिंग आणि पोलीस निरीक्षक एन. कोलनची यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मळद, गुणवडी, डोर्लेवाडी, मेखळी, जळगाव, कऱ्हावाघज, मोरगाव, तरडोली आदी मतदान केंद्राला भेट देवून पाहणी केली. तसेच निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आहे.
अभिजित बिचुकले यांनी आतापर्यंत लढविलेल्या निवडणुका
विविध निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करून अभिजित बिचुकले हे कायम चर्चेत रहात असतात. २०२२ मध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यासाठी किमान १०० आमदारांच्या स्वाक्षरी आवश्यक असतात. त्यामुळे त्यांना अर्ज भरता आला नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वरळी मतदार संघातून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढविली. तसेच सातारा येथूनही त्यांनी अर्ज भरला होता. २०२४ विधानसभा निवडणुकीत त्यांनी कसबा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली. २०१९ आाणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीतही ते अनेकदा उभे राहिले आहेत.









