संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
दौंड – दौंड येथील एसआरपीएफ मैदानावर पोलीस भरतीदरम्यान धक्कादायक प्रकार घडला असून, ‘शॉर्टकट’ वापरण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचं पोलीस होण्याचं स्वप्न धुळीस मिळालं आहे.
मैदानी चाचणीत अधिक गुण मिळवण्यासाठी उत्तेजित पेय घेतल्याने त्याची प्रकृती बिघडली आणि भर मैदानातच त्याने विचित्र वर्तन करत गोंधळ घातला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित उमेदवाराने धावण्याच्या चाचणीत वेग वाढवण्यासाठी अंमली स्वरूपाचे किंवा शक्तीवर्धक पेय घेतले होते. सुरुवातीला त्याने धावण्याची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आणि मैदानाबाहेर गेला. मात्र काही वेळातच त्या पेयाचा विपरीत परिणाम दिसू लागला. तो अचानक ओरडू लागला, अस्वस्थ झाला आणि नियंत्रणाबाहेर जाऊन धिंगाणा घालू लागला.
या प्रकारामुळे मैदानावर उपस्थित इतर उमेदवार आणि अधिकारी काही काळ घाबरून गेले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच एसआरपीएफ जवानांनी तात्काळ धाव घेत त्याला नियंत्रणात आणले. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केल्याने सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे पोलीस भरती प्रक्रियेतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शारीरिक क्षमतेपेक्षा ‘शॉर्टकट’ वापरून यश मिळवण्याचा प्रयत्न किती धोकादायक ठरू शकतो, याचा हा गंभीर दाखला मानला जात आहे. या प्रकरणानंतर भरती प्रक्रियेत तपासणी अधिक कडक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









