संपादक – गणेश जाधव प्रतिनिधी – रोहित माने
बारामती-( 6 एप्रिल) बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आज एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आपला उमेदवारी अर्ज न भरता निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
महायुतीच्या नेत्यांनी आणि विशेषतः दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळे हाके यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केल्याचे समजते. यामुळे बारामतीमधील लढत आता थेट सुनेत्रा पवार विरुद्ध काँग्रेसचे आकाश मोरे अशी होणार आहे.
लक्ष्मण हाके हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बारामतीत दाखल झाले होते. मात्र, त्याच वेळी महायुतीचे नेते कामाला लागले. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तातडीने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. अजितदादांच्या निधनामुळे निर्माण झालेली भावनिक परिस्थिती आणि बारामतीच्या विकासाची निरंतरता लक्षात घेऊन ही निवडणूक बिनविरोध व्हावी किंवा किमान महायुतीला पाठिंबा मिळावा, यासाठी भरणे यांनी हाके यांची मनधरणी केली.
स्वतः सुनेत्रा पवार यांनी लक्ष्मण हाके यांना फोन करून चर्चेचे आवाहन केले होते. याबद्दल बोलताना हाके म्हणाले की, सुनेत्रा ताई पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उदय सामंत, धनंजय मुंडे आणि दत्ता भरणे या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला. या सर्वांनी माझ्याशी संपर्क साधल्यानंतर मी विचार केला. सुनेत्रा पवार यांचा ज्यावेळेस मला फोन आला, त्यावेळेस मी ठरवले की नाही. इतके सगळे लोक आपल्याला फोन करत असतील तर आपण विचार करायला हवा,असे म्हणत त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली.
लक्ष्मण हाके यांनी पुढे म्हणाले की, माझा आता देखील फॉर्म तयार आहे. पण, विद्रोहाची भूमिका घेत असताना अशा गोष्टींना सामोरे जावेच लागते. मी माझ्या प्रश्नावर ठाम राहणार आहे. मी माझे प्रश्न आक्रमकपाने मांडतच राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
मला सगळ्या नेत्यांचे कॉल आले. पण माझ्यासाठी अंतिम कॉल होता, माझ्यासाठी जो संवेदनशील होता, तो महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा होता. हा कॉल आल्यानंतर मला वाटलं, येस… महाराष्ट्राची महिला उपमुख्यमंत्री आहे. आपली व्यवस्था ही सहानुभूती, दु:खद निधन, अपघाती निधन, ही जी भावनिक किनार आहे, ती सगळ्या गोष्टींवर मात करुन जाते, असे देखील लक्ष्मण हाके यांनी सांगितले.









