संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांच्यासह एकूण ३० उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत.
छाननी प्रक्रियेनंतर ५३ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी फोनवर संपर्क साधून काँग्रेसने उमेदवार माघारी घ्यावा, अशी विनंती केली. त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीने शेवटपर्यंत प्रयत्न केले. यातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या वहिनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करायला जाऊ शकतात, असे म्हटले जात आहे.
बारामतीची पोटनिवडणूक लढली पाहिजे, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती. काँग्रेसचे हे वैचारिक पाऊल योग्यच आहे. पण, याबरोबर महाराष्ट्राची संस्कृती, समंजसपणा, सभ्यता याची एक किनारही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटातील नेत्यांनी संवाद साधून उमेदवारी माघारी घेण्याची विनंती केली होती.
त्यानंतर राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांशी व पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून बारामतीतून काँग्रेसची उमेदवारी माघारी घेत आहोत. आज दोन पावले मागे येऊन माघार घेतली असली तरी २०२९ च्या निवडणुकीत बारामतीतून काँग्रेसचा आमदार असेल.
सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार?
पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी जाणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर, त्यांनी विचारायला हवे. पैसा आणि सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे असते. त्यामुळेच मी नेहमी सांगते की, रिश्ते मायने रखते है. संपूर्ण कुटुंब सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
दरम्यान, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध का होऊ शकली नाही, याबाबतचे उत्तर तुम्ही त्यांनाच विचारा. कारण यासाठीची सर्व मॅनेजमेंट तेच पाहत होते. दिवसभर बारामतीत नव्हते. त्यामुळे नेमके काय घडले, याची मला माहिती नाही. निवडणूक काळात निवडणूक लढविण्यास कार्यकर्ते उत्सुक असतात, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.









