तुम्ही राजकारणात उभे आहात ते शरद पवारांमुळे उभे आहात, बारामती पोटनिवडणुकीबाबत संजय राऊत यांचे वक्तव्य


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून प्रचारसभांना जोरदार सुरुवात झाली आहे. उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काल प्रचाराचा नारळ फोडत अधिकृतपणे प्रचाराला सुरुवात केली. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते मैदानात उतरले असून सोशल मीडियावरही प्रचाराला वेग आला आहे.

विशेष म्हणजे पोस्टमध्ये शरद पवार यांचा फोटो झळकल्याने चर्चांना उधाण आलं आहे. तसेच सुप्रिया सुळे या देखील प्रचारसभांमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली आहे.या सर्व प्रश्नांवरून आज संजय राऊतांना माध्यमांनी प्रश्न विचारले. त्यावर संजय राऊतांनी अजित पवार गटातील नेत्यांना कानपिचक्या देत उत्तर दिलं आहे.

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये शरद पवारांच्या फोटोबाबत संजय राऊत म्हणाले, “शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का? तुम्ही कितीही मोठे झाला असाल, अजित दादा असतील, सुनेत्रा पवार, त्यांचे चिरंजीव असतील. तुम्ही राजकारणात उभे आहात ते शरद पवारांमुळे उभे आहात, याचा विसर पडता कामा नये. तुम्ही आम्ही कोण आहोत? आम्ही ठाकरे या नावामुळे आहेत. ठाकरे या नावाला वैभव आणि गौरव बाळासाहेब ठाकरेंनी मिळवून दिला. तेच नसते तर आम्ही काय?”

पवारांनी बारामती उभी केली नसती तर…

“बारामती म्हणजे शरद पवार हे लक्षात घ्या. आज तुम्हाला मोदी आणि शहांनी उभं केलं असेल, पण शरद पवार नसते, त्यांनी बारामती उभी केली नसती, तर त्या पुढच्या कोणत्याही पवारांना महाराष्ट्रात कोणतंच स्थान मिळालं नसतं. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना उभी केली नसती तर आम्हाला राज्यात काहीच करता आलं नसतं. त्यामुळे माणसांनी कृतज्ञता ठेवायलाच पाहिजे”, असा खोचक सल्लाही संजय राऊतांनी दिला.

“कितीही नाही म्हटणालात, टाळण्याचा प्रयत्न केलात तरी पवारांची पुण्याई आहेच. निवडणुकीत जय पराजय होत असतात. हा त्यांचा कौटुंबिक विषय असून ते एकत्र आल्यास ते एका निवडणुकीपुरतं आहे. ही निवडणूक अजित दादांना श्रद्धांजली म्हणून पाहिली पाहिजे”, असंही ते म्हणाले.

सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करा

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत, असं विधान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रचारसभेत केलं. त्यांच्या या विधानावर संजय राऊत म्हणाले, “अजित दादांना मुख्यमंत्री होता आलं नाही, पण भाजपा सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करणार असतील तर तो भाजपाचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्याआधी एकनाथ शिंदेंऐवजी सुनेत्रा पवारांची निवड करत आहेत की काय असा यांच्या बोलण्यातून जाणवतंय” असंही ते म्हणाले.

 

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!