अमरावती हादरलं! ५०० रुपयांच्या पैजेतून उघड झाला भीषण लैंगिक शोषणाचा प्रकार


अमरावती – मैत्रीत छोट्या छोट्या गोष्टींवर पैज लागते, पण हीच पैज कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करेल, असा विचारही कुणी केला नसेल. अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात दोन मित्रांमध्ये लागलेल्या ५०० रुपयांच्या पैजेतून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अचलपूर येथील महाविद्यालयात शिकणारे अयान अहमद आणि उझैर खान या दोन मित्रांमध्ये “कोण जास्त मुली पटवतो” यावर पैज लागली होती. या पैजेचा पुरावा म्हणून अयान आपल्या मोबाईलमध्ये मुलींसोबतचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ जमा करत होता. मात्र, ही विकृती पुढे गंभीर गुन्ह्यात रूपांतरित झाली.

एकदा उझैर खानने अयानचा मोबाईल तपासला असता त्याला हे धक्कादायक व्हिडिओ आणि फोटो आढळले. त्याने हे सर्व आपल्या मोबाईलमध्ये घेतले आणि इतर मित्रांना पाठवले. पैशांवरून झालेल्या वादातून हे व्हिडिओ पुढे व्हायरल झाले आणि अखेर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

सूत्रांच्या माहितीनुसार, उझैरने अयानकडे पैशांची मागणी केली होती. मात्र अयानने पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या उझैरने सूडाच्या भावनेतून हे सर्व व्हिडिओ लीक केले. मित्राला बदनाम करण्याच्या नादात त्याने एका मोठ्या लैंगिक शोषणाच्या प्रकाराचा पर्दाफाश केला.

पोलीस चौकशीत अयानने धक्कादायक कबुली दिली आहे. तो अमरावती शहरात एका मित्राची खोली काही तासांसाठी भाड्याने घेत होता. तिथे मुलींना नेऊन त्यांचं लैंगिक शोषण करून नकळत फोटो आणि व्हिडिओ काढले जात होते. या प्रकरणात त्या मित्रालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत पोलिसांच्या हाती १८ हून अधिक व्हिडिओ आणि ३९ आक्षेपार्ह फोटो लागले आहेत.

या प्रकरणाचा सुगावा १० दिवसांपूर्वी अचलपूरचे नगरसेवक मुजीब रशीद यांना लागला होता. त्यांनी अयानला जाब विचारला असता त्याने माफी मागत आपण सुधारल्याचं सांगितलं. मात्र प्रत्यक्षात हा प्रकार सुरूच होता.

परतवाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने करत अयान अहमद, उझैर खानसह एकूण ८ जणांना अटक केली आहे. यामध्ये व्हिडिओ तयार करणारे, शेअर करणारे आणि या कृत्यात साथ देणाऱ्या इतर आरोपींचाही समावेश आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!