कोयत्याचा वार करत प्रेमी युगलाला लुटणारा आरोपी जेरबंद, बारामती पोलिसांची मोठी कारवाई


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – तांदुळवाडी येथील एलसी कंपनी लेक परिसरात प्रेमी युगलावर कोयत्याने हल्ला करून लूट करणाऱ्या आरोपीला अखेर बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ जून २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास मार्केटयार्ड परिसरातील २२ वर्षीय तरुण आपल्या मैत्रिणीसोबत तांदुळवाडी विमानतळ रोडलगत असलेल्या एलसी कंपनी लेक परिसरात बसला होता. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी तोंडाला रूमाल बांधून त्यांच्यावर हल्ला केला.

आरोपींनी मोबाईल व पैसे देण्याची मागणी केली. मात्र तरुणाने विरोध केल्याने एका आरोपीने लोखंडी कोयत्याने त्याच्या पायावर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी जबरदस्तीने २,५०० रुपये रोख रक्कम, मोबाईल आणि तरुणीच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी हिसकावून घेतली. तसेच मोटारसायकलची चावी घेऊन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यानंतर आरोपी फरार होते. मात्र पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत अजय नंदकुमार सकट (रा. तांदुळवाडी, ता. बारामती) याला १५ एप्रिल २०२६ रोजी अटक केली.

अटक केलेल्या आरोपीकडून ४.९०० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हस्तगत करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पुढील तपास पोलीस करत आहेत.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!