बारामतीत सांगता सभेचे ठिकाण बदलले; मिशनरी बंगला मैदानाची परंपरा खंडित


बारामती – (ता.20) लोकसभा असो किंवा विधानसभा बारामतीतील कोणतीही निवडणूक म्हटलं की पवार कुटुंबीयांच्या प्रचाराची सांगता मिशनरी बंगला मैदानावर होणं ही जणू परंपराच बनली होती. मात्र, यंदाच्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत ही परंपरा पहिल्यांदाच खंडित होताना दिसत आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा मंगळवारी (२१ एप्रिल) मिशनरी बंगला मैदानाऐवजी बारामतीतील शारदा प्रांगण येथे होणार आहे. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

सांगता सभेचे ठिकाण बदलण्यामागे सुरक्षा कारणे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून स्पष्ट करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी, वाहनांची व्यवस्था आणि प्रमुख नेत्यांची उपस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र, या बदलामागे राजकीय चर्चा देखील रंगल्या आहेत. भाजपकडूनच सभेचे ठिकाण बदलण्याचा आग्रह धरण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मिशनरी बंगला मैदान हे पवार कुटुंबीयांच्या शक्तिप्रदर्शनाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे महायुतीच्या नव्या राजकीय समीकरणात नवीन सुरुवात करण्यासाठी हा बदल करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बारामतीकरांसाठी मिशनरी बंगला मैदानावरील सांगता सभा ही केवळ प्रचारसभा नसून विजयाची नांदी मानली जात होती. मात्र, यंदा ही परंपरा खंडित होत असल्याने राजकीय वातावरणात वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!