पुण्यात धक्कादायक घटना! आत्याच्या मुलाशी लग्न… 21 वर्षीय विवाहितेन संपवल जीवन


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

पुणे – (ता.२०)वाघोली परिसरात दीर्घकाळ सुरू असलेल्या हुंडा व पैशांच्या मागण्यांमुळे होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका 21 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात सासू आणि पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मृत विवाहितेचे नाव प्रतिक्षा जयसिंग कदम (वय 21) असे असून, तिचे वडील बन्सी योगीराज खामकर (रा. ता. केज, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक्षाचा विवाह 9 मे 2023 रोजी मोठ्या थाटामाटात जयसिंग कदम याच्यासोबत पार पडला होता. लग्नावेळी प्रतीक्षाच्या वडिलांनी क्षमतेनुसार खर्च केला होता आणि वराला 5 ग्रॅम सोन्याची अंगठी देण्यात आली होती. लग्नानंतर आणखी एक अंगठी देण्याचे ठरले होते.

आत्याकडे लहानाची मोठी

महत्वाची बाब म्हणजे प्रतिक्षा ही लहानपणापासून तिच्या आत्याच्या म्हणजेच हौसाबाई कदम यांच्या घरीच राहत होती. तिच्या आई-वडिलांना सतत ऊसतोडीच्या कामासाठी बाहेर जाणं होत असल्याने आणि आत्याकडे मुलगी नसल्यामुळे प्रतिक्षाचा सांभाळ लहानपणापासून त्यांच्याकडेच झाला होता. ती शिक्षणासाठी आणि वाढीसाठीही त्याच घरात राहिली होती, त्यामुळे ती त्या कुटुंबाशी अगदी जवळची होती. याच कारणामुळे पुढे आत्याने मुलगा जयसिंगच्या लग्नासाठी मागणी घातली. जयसिंग हा फरशी बसविण्याचे काम करत होता. कुटुंबीयांच्या संमतीने प्रतीक्षाचा विवाह आत्याचा मुलगा जयसिंग कदम याच्यासोबत 9 मे 2023 रोजी करण्यात आला.

मात्र, लग्नानंतर साधारण सहा महिन्यांनी प्रतिक्षाच्या सासरकडून बाकी अंगठीची मागणी सुरू झाली. सासू हौसाबाई कदम आणि पती जयसिंग कदम हे सतत या मागणीवरून तिला टोमणे मारणे, शिवीगाळ करणे आणि मानसिक त्रास देत होते. काही काळ परिस्थिती सामान्य झाली, मात्र त्यानंतर पुन्हा छळाचे प्रमाण वाढल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, 2024 मध्ये प्रतिक्षाला मुलगी झाली. त्या वेळीही सासरच्यांनी कोणतीही साथ दिली नाही. मुलगी झाल्यामुळे नाराजी व्यक्त करत तिच्या डिलिव्हरीचा खर्चही केला गेला नाही, तसेच तिला भेटण्यासाठीदेखील कोणी गेले नाही. डिलिव्हरीनंतर ती पुन्हा सासरी परतल्यानंतर घरातील सर्व कामांचा ताण तिच्यावर टाकण्यात आला. लहान बाळाची जबाबदारीदेखील तिलाच एकटीला सांभाळावी लागत होती.

याच काळात पती जयसिंग कदम हा वारंवार दारू पिऊन येत आणि किरकोळ कारणांवरून प्रतिक्षाला मारहाण करत असल्याची माहिती ती आपल्या आई-वडिलांना देत होती. जानेवारी 2025 मध्ये ती माहेरी गेली असताना देखील तिच्यावर मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता. नातेवाईकांच्या मध्यस्थीने तिला पुन्हा सासरी पाठवण्यात आले, मात्र त्यानंतरही छळ सुरूच राहिला.

जानेवारी 2026 मध्ये जयसिंग कदम याने मारुती स्विफ्ट डिझायर कार खरेदी केली. त्यानंतर कारचे हप्ते भरण्यासाठी माहेराकडून पैशांची मागणी सुरू झाली. प्रतिक्षा वारंवार फोन करून आपल्यावर पैशांसाठी दबाव टाकला जात असल्याचे सांगत होती. कुटुंबीयांनी काही काळ थांबण्याची विनंती केली होती, मात्र सासरकडील त्रास कमी झाला नाही.

16 एप्रिल 2026 रोजी रात्री प्रतिक्षाने वडिलांना फोन करून 22 एप्रिल रोजी गावच्या यात्रेला येण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्याच वेळी पती जयसिंग याने तिचा फोन हिसकावून तिला धमकावले आणि यात्रेला जाऊ देणार नाही, तसेच मारहाण करण्याची धमकी दिली.

वाघोली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमांनुसार सासू हौसाबाई मधुकर कदम आणि पती जयसिंग मधुकर कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल भगवान काळे करत आहेत.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हुंडा प्रथेमुळे अजूनही महिलांना जीव गमवावा लागत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!