संपादक – गणेश जाधव प्रतिनिधि – रोहित माने
बारामती : एमआयडीसी परिसरातील कल्याणी ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी कंपनीसमोर उभ्या असलेल्या ट्रकची बॅटरी चोरी करणाऱ्या चोरट्याला बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांत गजाआड केले.पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रान्सपोर्ट व्यवसायिक जनार्धन रघुनाथ रांधवन (३१) यांचा एमएच १४ डीएम ९१८१ हा टाटा ११०९ ट्रक २५ नोव्हेंबर रोजी सकाळी कंपनीसमोर पार्क करण्यात आला होता. पुढील दिवशी ते वाहनाकडे गेले असता, ट्रक सुरू न झाल्याने त्यांनी खाली उतरून पाहणी केली असता बॅटरीची वायर कापलेली व बॅटरी गायब असल्याचे निदर्शनास आले. सुमारे १० हजार रुपये किमतीची बॅटरी चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी तत्काळ बारामती तालुका पोलीस ठाण्यात दिली.
तक्रार मिळताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज, हालचाली आणि माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवली. पोलिसांना मिळालेल्या धागेदोऱ्यावरून शिवम प्रेमप्रकाश यादव (रा. घाडगे वस्ती, एमआयडीसी बारामती) हा संशयित ताब्यात घेण्यात आला. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी चोरीस गेलेली बॅटरी जप्त करून त्याला अटक केली. न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, अंमलदार सुरेंद्र वाघ, अमोल पवार आणि भारत खारतोडे यांनी संयुक्तपणे केली.








