संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
गोवा – गोव्यातील उत्तर भागात शनिवारी रात्री उशिरा एका नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली असून या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग भडकली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन सांगितले की, मृतांमध्ये क्लबच्या स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे, ज्यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे, तसेच तीन ते चार पर्यटकही या दुर्घटनेत बळी पडले आहेत. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की काही जणांचा जळून तर बहुतांश लोकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला आहे.
उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील रोमियो लेन जवळील ‘बर्च’ या ठिकाणी ही दुर्घटना घडली असून मृतांमध्ये ४ पर्यटक आणि १४ कर्मचारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याशिवाय ७ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासानुसार, संबंधित नाईट क्लबमध्ये आग सुरक्षा नियमांचे पालन केले जात नव्हते. राजधानी पणजीपासून २५ किमी अंतरावर असलेले हे लोकप्रिय पार्टीचे ठिकाण गेल्या वर्षीच सुरू झाले होते. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले आहे की, सुरक्षा नियमांचे उल्लंघन करूनही क्लब चालवण्याची परवानगी देणारे अधिकारी आणि क्लब व्यवस्थापन यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला असून राज्य सरकार पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वोतोपरी मदत करत असल्याचे सांगितले आहे.








