संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी- रोहित माने
नागपूर – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेल्या योजनांपैकी एक योजना आहे. या योजनेवरुन विधीमंडळात जोरदार घमासान होताना बघायला मिळालं आहे. राज्य विधीमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे.
हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जातोय. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये आर्थिक मदत देण्याचं आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलं होतं. पण अद्याप तशी घोषणा झालेली नाही. त्यामुळे या मुद्द्यावरुन विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जातोय. विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.
“लाडक्या बहिणींनी विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांना घरी बसवलं आहे. त्यामुळे आम्ही जी लाडकी बहीण योजना सुरु केली ती कधीही बंद होणार नाही. आम्ही जे बोललो, दर महिन्याला लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबतचा निर्णयही आम्ही घेऊ. ते आश्वासनही आम्ही पूर्ण करु”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
“लाडकी बहीण योजना जेव्हा आम्ही सुरु करत होतो तेव्हा हेच लोकं ही योजना बंद पडावी यासाठी कोर्टात गेले होते. याच लोकांनी नागपूरच्या कोर्टात धाव घेतली होती. ते महाविकास आघाडीचेच लोकं होती. पण आम्ही लाडकी बहीण योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. ही योजना कायम सुरु राहणार हेही मी सांगतो. आम्ही जे 2100 रुपये बोललो आहोत, योग्यवेळी आम्ही त्यांची पूर्तता करणार”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
महापालिका निवडणुकांबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं भाष्य
“उद्धव ठाकरे पर्यटनासाठी नागपुरात आले आहेत”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. तसेच “आगामी महापालिकेच्या निवडणुका आम्ही महायुतीने लढणार आणि महायुतीच जिंकणार. माझी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. तिथे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते. आमची सर्व चर्चा झाली. महायुतीने लढण्याचा निर्णय झालेला आहे”, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
“अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना हिंदुत्वाच्या बाबत आव्हान देण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना आहे का? जी आर स्वामीनाथन जे मद्राय हायकोर्टाचे जस्टीस आहेत, त्यांना इमपिचमेंट आणण्याचा जो लेटर दिलं आहे त्यावर त्यांची सही आहे. ज्यांनी मंदिरात दिवा लावला पाहिजे असा निर्णय दिला. मुंबईत जे याकूब मेननची कबर सजवतात आणि इकबाल मुसा जो सिरिअल बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी आहे तो ह्यांच्या प्रचारात बघायला मिळाला, हा कोणता हिंदुत्ववाद आहे? पाकिस्तानचे झेंडे त्यांच्या प्रचारात नाचवले जातात, हा कोणता हिंदुत्व आहे? त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले तेव्हाच त्यांनी हिंदुत्वावर बोलण्याचा नैतिक अधिकार गमावला”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.








