संपादक – गणेश जाधव
भिगवण-बारामती मार्गावरील पिंपळे गावच्या हद्दीत रविवारी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी अपघात झाला, ज्यात २७ वर्षीय हरी आण्णा धोत्रे (रा. मदनवाडी, भकासवाडी) यांचा मृत्यू झाला.हा अपघात उस तोडणी हंगामातील बेदरकार वाहतुकीमुळे घडलेल्या अपघातांच्या मालिकेतील बळी मानला जात आहे.
पोलिसांच्या माहितीप्रमाणे, अपघात दुचाकी आणि ट्रॅक्टर यांच्यात झाला असून, धडक कशी झाली हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. धडक इतकी गंभीर होती की, धोत्रे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांच्या दुचाकीचा मोठ्या प्रमाणावर चुराडा झाला.
स्थानिकांचे म्हणणे आहे की, जास्त ओव्हरलोड असलेली वाहने, वेगाने चालणारी वाहने, रिप्लेक्टर नसलेले ट्रॅक्टर आणि नियम न पाळणारी वाहने या कारणांमुळे परिसरात अपघात वारंवार घडत आहेत. नागरिक वारंवार प्रशासनाकडे रस्ते सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत.
भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी सांगितले की, संबंधित वाहनांचा शोध सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.








