संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती तालुक्यातील जळगाव क.प. गावाजवळील राज्य मार्गावर सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका ग्रामसेवकाचा मृत्यू झाला. रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात घडला.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. तसेच संतप्त ग्रामस्थांनी काही काळ रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.
या अपघातात मधुकर धोंडीबा जगताप (रा. भिलारवाडी) यांचा मृत्यू झाला. ते मेडद ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून काम करत होते. सोमवारी रात्री काम आटोपून ते आपल्या घरी परतत असताना जळगाव क.प. गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. या राज्य मार्गावर अद्याप गतिरोधक नसल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जळगाव क.प. येथे काही काळ रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांशी चर्चा करून परिस्थिती शांत केली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या ठिकाणी लवकरच गतिरोधक बसवण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
दरम्यान, अपघात घडवून पळून गेलेल्या वाहनाचा क्रमांक पोलिसांना मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत. कर्तव्यदक्ष म्हणून ओळख असलेल्या जगताप यांच्या निधनामुळे भिलारवाडी आणि मेडद परिसरात शोककळा पसरली आहे.









