संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
पुणे – चंदननगर परिसरात अनैतिक संबंधाच्या वादातून एका 32 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका वकिलासह त्याची पत्नी आणि मुलीला पोलिसांनी अटक केली आहे.मृत महिलेचे नाव पूनम दिनेश मुन (वय 32, रा. गणेशनगर, येरवडा) असे आहे. याबाबत तिचे पती दिनेश मुन यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲड. संजय सावंत यांचे पूनम मुन हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. पूनम गेल्या साडेतीन वर्षांपासून सावंत यांच्या जुन्या मुंढवा रस्त्यावरील कार्यालयात सहाय्यक म्हणून काम करत होती.
गुरुवारी (दि. 16) सकाळी पूनम नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. त्यानंतर सावंत, त्यांची पत्नी स्वाती आणि मुलीने मिळून तिला बॅटने मारहाण केली. तसेच तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आली.घटनेनंतर आरोपींनी मृतदेह पोत्यात ठेवून लपवण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत पूनम घरी न परतल्याने तिच्या पतीने सावंत यांच्याशी संपर्क साधला. मात्र, पूनम मैत्रिणीकडे गेल्याचे खोटे सांगण्यात आले.
शुक्रवारी सकाळी संशय आल्याने पूनमचे पती सावंत यांच्या कार्यालयात गेले असता, कार्यालयाचा दरवाजा उघडा होता आणि आत पूनम रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळली. यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक, नूतन पवार आणि पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
चंदननगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ॲड. सावंत आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले, तर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सावंत यांची पत्नी स्वाती हिला अटक केली. विशेष म्हणजे, या खून प्रकरणाचा अवघ्या सहा तासांत छडा लावत पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले आहे.






