संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राज्यात राजकीय नाराजीचं वातावरण कायम असतानाच आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेना गटाला साताऱ्यात मोठा धक्का बसला आहे. शहराध्यक्ष निलेश मोरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत पक्षात खळबळ उडवली आहे.
साताऱ्यात गांधी मैदानावर शिंदे यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असताना, त्याआधीच हा ‘लेटर बॉम्ब’ फुटल्याने संघटनेला मोठा धक्का बसला आहे. शहरप्रमुखापासून ते बूथ प्रमुखांपर्यंत अनेकांनी राजीनामे दिल्याने पक्षातील अंतर्गत वाद उघडपणे समोर आला आहे.
निलेश मोरे यांनी आपल्या राजीनामा पत्रातून पक्षातील कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “कार्यकर्ते जीव तोडून काम करतात, मात्र श्रेय आणि निधी नातेवाईकांनाच दिला जातो,” असा आरोप त्यांनी केला. विकास निधी वाटपात पक्षपात, नियोजन समितीतून नाव वगळणे आणि सातत्याने डावलले जाणे, यामुळे नाराजी वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
गोवा-गुवाहाटीच्या राजकीय घडामोडीनंतरही पक्षाशी निष्ठा ठेवून काम केल्याचा दावा करत, “निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच दुय्यम वागणूक मिळत असेल तर निष्ठेचा काय उपयोग?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, “आमची निष्ठा शिंदे यांच्याशी कायम राहील, मात्र पदावर काम करण्याची इच्छा उरलेली नाही,” असे स्पष्ट करत मोरे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. या घडामोडींमुळे साताऱ्यातील शिवसेना संघटनात्मक स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे








