बारामतीत मतदानासाठी 23 एप्रिलला मिळणार पगारी सुट्टी


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती: (ता .20) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र विधानसभेच्या २०१-बारामती मतदारसंघासाठी येत्या २३ एप्रिल २०२६ रोजी पोटनिवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे आणि सुलभरीत्या बजावता यावा, यासाठी प्रशासनाने मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांना भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येक मतदाराचा सहभाग निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, याबाबतचे अधिकृत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

या आदेशानुसार, बारामती मतदारसंघातील जे मतदार कामानिमित्त मतदारसंघाबाहेर कार्यरत आहेत, त्यांनाही मतदानासाठी पगारी सुट्टी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही सवलत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना लागू असेल. यामध्ये खाजगी कंपन्या, कारखाने, आयटी कंपन्या, दुकाने, हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, शॉपिंग मॉल्स तसेच विविध व्यापारी आणि औद्योगिक आस्थापनांचा समावेश आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या पगारातून या सुट्टीसाठी कोणतीही कपात केली जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

प्रशासनाने पुढे स्पष्ट केले आहे की, ज्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमुळे पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसेल, अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे आवश्यक राहील. मतदानासाठी हक्काची सुट्टी किंवा सवलत न मिळाल्यामुळे जर एखादा कर्मचारी मतदानापासून वंचित राहिला, तर संबंधित आस्थापना मालकांविरुद्ध प्रशासनाकडून कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व खाजगी व शासकीय संस्थांनी या नियमाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!