भोंदूगिरीचा पर्दाफाश! ‘बाळूमामाचा अवतार’ म्हणवणारा मनोहर मामा भोसले पोलिसांच्या जाळ्यात


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण ताजं असतानाच सोलापूरमध्ये आणखी एका स्वयंघोषित गुरूचा भांडाफोड झाला आहे. स्वतःला ‘बाळूमामाचा अवतार’ म्हणवून घेत भक्तांची फसवणूक करणाऱ्या मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मनोहर भोसले याच्यावर यापूर्वीही आर्थिक फसवणूक, भोंदूगिरी आणि बलात्कारासारखे तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये तो जामिनावर बाहेर होता. मात्र पुन्हा एकदा आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली तो पोलिसांच्या ताब्यात गेला आहे.

करमाळा तालुक्यातील घोटी येथे मनोहर मामाचा आलिशान आश्रम उभारण्यात आला होता. विशेष म्हणजे दर अमावस्येला या आश्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे. राजकीय नेते, उद्योजक, तसेच समाजातील बडी मंडळी येथे हजेरी लावत असत. घरगुती अडचणी, आर्थिक समस्या किंवा भविष्य जाणून घेण्याच्या नावाखाली अनेकजण मामाच्या जाळ्यात अडकत होते.

मात्र स्थानिक ग्रामस्थांनी या भोंदूगिरीवर कधीही विश्वास ठेवला नसल्याची माहिती समोर आली आहे. आश्रमात प्रवेशासाठी तब्बल ११ हजार रुपयांची पावती घ्यावी लागत असल्याचाही खुलासा झाला आहे.

सुमारे २७ एकरांवर पसरलेल्या या आलिशान आश्रमात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली होती. आश्रमासमोर आंब्याची बाग, भव्य सभा मंडप आणि राजस्थान व कोकणातून आणलेल्या लाल दगडांचा वापर करण्यात आला होता. तसेच भक्तांसाठी मोठे हॉल आणि मामांसाठी आलिशान केबिनही तयार करण्यात आली होती.

दर अमावस्येला शंभर ते दीडशे आलिशान गाड्यांची वर्दळ येथे दिसत होती. सर्वच राजकीय पक्षांचे नेते, आमदार, खासदार आणि उद्योगपती यांचा यात समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

सध्या या आश्रमावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बाहेरील कोणालाही आत प्रवेश दिला जात नसून आश्रमातील व्यक्तींनाही बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

सोलापूर पोलिसांनी भोंदूगिरीविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून, मनोहर भोसले प्रकरणानंतर अशा बनावट बाबांवर मोठी मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!