शिरूरमध्ये रस्त्यावरच प्रसूती; महिलांच्या तत्परतेमुळे आई-बाळ सुरक्षित, ‘माणुसकी’चा जिवंत नमुना


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

पुणे- (ता.25)आजकाल“माणुसकी संपलीय”असं म्हटलं जात असलं, तरी पुण्यातील शिरूरमध्ये घडलेल्या एका घटनेने हे विधान खोटं ठरवलं. निर्माण प्लाझा परिसरात आज एक थरारक आणि तितकीच मनाला स्पर्श करणारी घटना घडली.

जोशीवाडी येथील एक गरीब गरोदर महिला पोटात तीव्र वेदना होत असल्याने शिरूर ग्रामीण रुग्णालयाकडे पायी निघाली होती. मात्र निर्माण प्लाझाजवळ पोहोचताच तिच्या प्रसूती कळा तीव्र झाल्या. वेदना असह्य झाल्याने ती रस्त्यातच बसली आणि काही क्षणांतच तिने तिथेच बाळाला जन्म दिला.

हा प्रकार लक्षात येताच परिसरातील महिलांनी तत्काळ धाव घेतली. कुणी आपला स्कार्फ काढून आडोसा केला, तर कुणी शेजारच्या घरातून साड्या आणून सुरक्षित वातावरण तयार केलं. सर्व महिलांनी मिळून त्या गरोदर महिलेला धीर देत प्रसूतीस मदत केली.

दरम्यान, ही माहिती मिळताच नगरसेविका डॉ. सुनिता पोटे आणि पूजा पोटावळे घटनास्थळी पोहोचल्या. बाळाचा जन्म झाल्यानंतर ते रडत नसल्याने काही क्षण तणावाचं वातावरण निर्माण झालं. मात्र डॉ. सुनिता पोटे यांनी प्रसंगावधान राखत बाळाची तपासणी करून आवश्यक ती मदत केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे काही क्षणांतच बाळाने रडायला सुरुवात केली आणि उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

तणावपूर्ण वातावरण काही क्षणांतच आनंदात बदललं. ‘निर्माण प्लाझावर झाला निर्माणचा जन्म’ असं म्हणत नागरिकांनी आनंद साजरा केला. या वेळी रिक्षाचालक, मेडिकल स्टोअर चालक, पत्रकार आणि इतर नागरिकांनीही मोलाची मदत केली.

यानंतर आई आणि बाळाला मिरा नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं असून डॉक्टरांच्या माहितीनुसार दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.

ही घटना समाजाला एक मोठा संदेश देऊन जाते—अजूनही माणुसकी जिवंत आहे. संकटाच्या वेळी कोण मदतीला धावून येईल हे सांगता येत नाही; मात्र आज शिरूरमध्ये फक्त एका बाळाचाच नव्हे, तर माणुसकीचाही जन्म झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!