वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात खळबळ; अत्याचार प्रकरणातील आरोपीची कोठडीत आत्महत्या


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – (ता. 28 )बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्यातील अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलीस कोठडीतच आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

रवींद्र आनंदराव गार्डी (वय ४८, रा. वडगाव निंबाळकर) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गार्डी याने नात्यातील एका अल्पवयीन मुलीवर वारंवार शारीरिक अत्याचार केले होते. या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिल्याची बाब समोर आल्यानंतर त्याने तिला फलटण येथील एका खासगी रुग्णालयात नेऊन गर्भपात केल्याचेही उघड झाले.

ही घटना पीडितेच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संतापाच्या भरात गार्डीला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध शारीरिक अत्याचारासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.

दरम्यान, आरोपी पोलीस कोठडीत असताना मध्यरात्रीच्या सुमारास त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.

या घटनेमुळे एकीकडे गंभीर गुन्ह्यामुळे संताप व्यक्त होत असताना, दुसरीकडे पोलीस कोठडीत झालेल्या आत्महत्येमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!