संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून या अटीतटीच्या लढतीत स्वरूपानंद देशमुख यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा अवघ्या ९२ मतांनी पराभव केला.
संतोष देशमुख यांच्या ९ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या निर्घृण हत्येनंतर सरपंचपद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. गावातील राजकीय वातावरणही काही महिन्यांपासून तणावपूर्ण होते.
या निवडणुकीत दोन्ही गटांनी आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जोरदार ताकद लावली. संतोष देशमुख यांच्या निधनामुळे अश्विनी देशमुख यांना सहानुभूतीची लाट मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. तसेच ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणीही काही ग्रामस्थ आणि कुटुंबीयांकडून करण्यात आली होती. मात्र, स्वरूपानंद देशमुख यांनी उमेदवारी कायम ठेवत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि अखेर विजयावर शिक्कामोर्तब केले.
मस्साजोगमध्ये एकूण २,२८४ मतदार असून यंदा तब्बल ८४ टक्के मतदान झाले. मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. सकाळी मतदानाचा वेग कमी असला तरी दुपारनंतर मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी गर्दी केली.
मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया किरकोळ गोंधळ वगळता शांततेत पार पडली. प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निकाल जाहीर होताच स्वरूपानंद देशमुख यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.







