मुंबईत ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादीचा मोठा निर्णय! झिशान सिद्दीकींना विधान परिषदेची उमेदवारी


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

(ता.30 )राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अखेर उमेदवाराची घोषणा करण्यात आली असून झिशान सिद्दीकी यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

काल (बुधवार) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने उमेदवाराच्या नावाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत सुनेत्रा पवार यांनी झिशान सिद्दीकी यांच्या नावाची घोषणा केली.

विधानसभा निवडणुकीपूर्वी झिशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर काही काळातच बाबा सिद्दीकी यांची बिश्नोई गँगकडून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. याच काळात झालेल्या विधानसभा निवडणुकीत झिशान सिद्दीकी यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

या पराभवानंतर झिशान यांच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, सुनेत्रा पवार यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा संधी दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा होती. सुमारे 80 नेत्यांची नावे चर्चेत होती, त्यापैकी पाच नावे अंतिम यादीत होती. मीडिया रिपोर्टनुसार पार्थ पवार यांनी विक्रम काकडे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. मात्र, पक्षाच्या बैठकीत झिशान सिद्दीकी यांच्या नावावर एकमत झाले.

विशेष म्हणजे, मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. मुंबईत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि उच्चभ्रू तसेच शहरी मतदारांमध्ये प्रभाव निर्माण करण्यासाठी झिशान सिद्दीकी यांची निवड करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!