“बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही” गिरीश महाजनांनी माफी मागावी, महिला कर्मचारी आक्रमक


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

नाशिक – मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचे काम दिले तरी मी करेन. पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही. त्यांनी आपली चूक स्वीकारावी. बाबासाहेबांचं नाव मंत्री आता तरी भाषणात घेतील, मग घेतील.

याची मी वाट पाहत होते. पण बाबासाहेबांचं नाव भाषणात आलं नाही. लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावं वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्याचं नाव भाषणात का नाही ?”, असा प्रश्न नाशिक येथील मुख्य प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात एका महिला कर्मचाऱ्याने थेट मंत्री गिरीश महाजन यांना करण्याची हिंमत दाखवली.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक पोलीस परेड मैदान येथे शासकीय ध्वजवंदन सोहळा झाला. मंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या विकास कामांची माहिती दिली. मंत्री महाजन यांच्या भाषणावेळी एक वेगळाच प्रकार घडला.

मंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजवंदन कार्यक्रमावेळी भाषण केले. गेल्या काही वर्षांतील आव्हानात्मक काळातून विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून, नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे मंजूर झाले आहेत. कुंभमेळा २०२६ च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणामार्फत सर्व विभाग समन्वयाने कामे प्रगतीपथावर आहेत. नाशिकमध्ये ‘रामकाल पथ’ विकसित करण्यात येत असून, यामुळे नाशिक जागतिक आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल. शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ६५ किलोमीटरचा बाह्य वळण रस्ता (रिंग रोड) प्रस्तावित असल्याचे महाजन यांनी सांगितले. महाजन यांनी कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या विकास कामांची माहिती दिली.

मंत्री गिरीश महाजन भाषण करत असताना त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याचा आरोप करीत एक महिला कर्मचारी संतप्त झाली. या महिला कर्मचाऱ्याने महाजन यांना जाब विचारला. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. गिरीश महाजन यांना जाब विचारणारी महिला कर्मचारी वन विभागात कार्यरत असल्याचे समजते. पोलिसांनी संबंधित महिला कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले. घटनास्थळी झालेल्या वादानंतर आपली भूमिका संबंधित महिला कर्मचाऱ्याने मांडली. ” ज्यांनी संविधान दिले, लोकशाही घडवली, त्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात घेतले नाही. ही मोठी चूक आहे. मला सस्पेंड केले तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही.” असा पवित्रा संबंधित महिलेने घेतला. या घटनेनंतर कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले.


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!