संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. विमान लँडिंग करत असताना ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना अजित पवार यांचे छोटे विमान बारामतीच्या धावपट्टीवर लँडिंगच्या वेळी अपघातग्रस्त झाले. प्राथमिक माहितीनुसार, विमान उतरत असताना ते धावपट्टीवरून घसरून बाजूला गेले. आज अजित पवार यांचे बारामतीत एकूण 4 ठिकाणी नियोजित कार्यक्रम होते. या कार्यक्रमांसाठीच ते मुंबईहून बारामतीत दाखल होत होते. मात्र लँडिंगदरम्यान अनपेक्षित प्रकार घडल्याने नियोजित दौऱ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक उपस्थित होते, अशी माहिती मिळत आहे. घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस आणि वैद्यकीय पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहेत. सध्या बचाव व तपासकार्य सुरू असून सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लँडिंगदरम्यान तांत्रिक बिघाड झाला की हवामान अथवा धावपट्टीवरील अडथळ्यामुळे हा प्रकार घडला, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. अधिकृत माहिती आणि पुढील अपडेट्सची प्रतीक्षा केली जात आहे.









