संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – बारामती शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येबाबत नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने तत्परतेने काम हाती घेतल्याचे समाधानकारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी ॲड. अक्षय गायकवाड, साजन अडसूळ आणि अभिजीत पवार यांनी मिळून मा. सचिनशेठ सातव (नगराध्यक्ष – बारामती नगरपरिषद) यांना शहरातील विविध भागांतील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत निवेदन दिले होते. तसेच WhatsApp द्वारेही समस्या त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती.
नगराध्यक्षांनी दिलेल्या शब्दाला कृतीची जोड देत तत्काळ अधिकाऱ्यांना पाहणीचे निर्देश दिले. दुसऱ्याच दिवशी संबंधित अधिकारी प्रत्यक्ष स्थळी दाखल झाले. ॲड. गायकवाड यांनी स्वतः अधिकाऱ्यांसोबत जाऊन रस्त्यांची पाहणी केली व समस्याग्रस्त ठिकाणे दाखवून दिली.
तसच हरिकृपानगर आणि कोर्टासमोर परिसरात प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाली असून काही ठिकाणी काम पूर्णही झाले आहे. कामादरम्यान खड्डे स्वच्छ झाडून, रस्ता योग्य प्रकारे उकरून त्यानंतर खडी टाकून दुरुस्ती केली जात असल्याचे दिसून आले.
या कामाची पाहणी करताना अधिकारी सोनवणे सर, काटे सर व कॉन्ट्रॅक्टर पवार सर स्वतः उपस्थित राहून दर्जेदार कामावर भर देत असल्याचे पाहायला मिळाले. “काम नीट करा, दर्जा चांगला ठेवा,” असे वारंवार सांगत ते देखरेख करत होते.
दरम्यान स्व. अजित पवार यांच्या निधनामुळे काही दिवस कामात विलंब झाला होता. मात्र त्यानंतर पुन्हा पाठपुरावा केल्यानंतर नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
नगराध्यक्षांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शहराच्या विकासाला प्राधान्य दिल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. “लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ आश्वासन नव्हे, तर कृतीतून उत्तर देणारा प्रतिनिधी,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
ॲड. अक्षय गायकवाड यांनी एक जागरूक नागरिक आणि वकील म्हणून हा प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवला. केवळ तक्रार न करता प्रत्यक्ष पाहणी, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि काम पूर्ण होईपर्यंत उपस्थित राहण्याची भूमिका त्यांनी घेतली.
“जनतेचा प्रश्न म्हणजे माझी जबाबदारी,” या भूमिकेतून बारामती शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.









