बारामती पोटनिवडणुकीत तिरंगी लढत? विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याने मोठा ट्विस्ट


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झाले. यानंतर, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिकामी झाली असून त्याठिकाणी 23 एप्रिलला मतदान आणि 4 मे रोजी निकाल लागणार आहे.

सुनेत्रा पवार या निवडणूक उभ्या राहतील आणि निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा सुरू होती. कारण खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याची महाविकास आघाडीची मानसिकता नसल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. मात्र बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्यायची की नाही? यावर लवकरच निर्णय जाहीर करू, असे वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले. यानंतर आता विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याने या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे.

सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, शरद पवार गटाची भूमिका आम्हाला मान्य नाही. जर तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस लढणार नसेल तर आम्ही तिकडे निवडणूक लढायचा विचार करू. पवार विरुद्ध पवार निवडणुका यापूर्वी झाल्या आहेत. ही जागा सध्या राष्ट्रवादी पक्षाकडे आहे. जेव्हा विलिनीकरण हा विषय होता, तेव्हा काँग्रेसशी चर्चा केली नव्हती. त्यानंतर आता निवडणुका होत आहेत. जर सुप्रिया सुळे म्हणाल्या असतील की, सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार कसा देणार? तर त्यांची भूमिका महाविकास आघाडी म्हणून आम्हाला मान्य नाही. जर राष्ट्रवादी काँग्रेस त्याठिकाणी लढणार नसेल तर काँग्रेसचा तिथे उमेदवार देण्याबाबत आम्हाला विचार करावा लागेल, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे. त्यामुळे आता बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लक्ष्मण हाके निवडणूक लढण्यावर ठाम

दोन दिवसांपूर्वीच माध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मण हाके म्हणाले होते की, राज्य शासनाच्या अनेक धोरणांच्या विरोधात आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. शरद पवारांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवले आहेच. मग सुनेत्रा पवारांनादेखील विधान परिषदेवर बिनविरोध पाठवा. याठिकाणी मी उमेदवार असेलच असे नाही, येथील स्थानिक उमेदवार देखील निवडणूक लढवू शकतो. मात्र आपण निवडणूक लढवावी यासाठी बारामतीतील कार्यकर्त्यांकडून मोठा आग्रह आहे. कारण अजित पवारांच्या निधनानंतर जर तिसऱ्या दिवशी शपथविधी होऊ शकतो, तर मग आम्हीच त्यांच्या निधनाचे दुःख का व्यक्त करायचे? असा प्रश्न उपस्थित करत बारातमी पोटनिवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले होते.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!