संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती तालुक्यातील बाबुर्डी, शेरेवाडी तसेच परिसरातील इतर जिरायती गावांमध्ये अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असून कधी प्रखर ऊन तर कधी अवकाळी पाऊस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या बदलत्या वातावरणाचा फटका आता थेट शेतीला बसू लागला आहे.
भारतीय हवामान विभागाने राज्यातील विविध भागांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला होता. त्यानुसार १८ ते २० मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातही अचानक वातावरण बदलले आणि काही भागांत जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली.
गारपिटीमुळे गहू, हरभरा, भाजीपाला आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असण्याची शक्यता आहे.विशेषतः जिरायती भागातील पिके आधीच पावसाअभावी तणावाखाली असताना या गारपिटीने त्यांची परिस्थिती आणखी बिकट केली आहे.
दरम्यान,पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









