संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
भोंदूबाबा अशोक खरात आधात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करत होता. तब्बल 150 पेक्षा अधिक महिलांचे शोषण झाल्याचे सांगितले जात आहे. 58 व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत.
या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान, या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा माध्यमांच्या समोर आपली भूमिका मांडली.
फडणवीस म्हणाले, खरात प्रकरण गंभीर आहे. आम्हीच त्याचा भांडाफोड केला. सामाजिक दबावामुळे महिला पुढे येत नाहीत. त्यांना आणि त्यांचा घराच्यांना धीर देत पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू आहे. मी स्वतः डीजींना याच्यावर लक्ष ठेवायला सांगितले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘काही लोक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाची सर्वात जास्त पुरावे माझ्याकडे आहेत. खरातांना भेटणाऱ्यांना भेटलं म्हणून कारवाई होणार असेल तर अवघड आहे. मग 40 किलोमीटर वळवून पाणी देणाऱ्यांचे काय? विनाकारण याला राजकीय रंग देऊ नये.
‘काहींना राजकारण करायचे आहे. आम्हाला मात्र महिलांच्या आत्मसन्मानामध्ये इंटरेस्ट आहे.’, . तसेच उद्धव ठाकरेंच्या काळात खरातच्या फाॅर्म हाऊसला पाणी दिले गेले. त्याविषयी प्रश्न विचारले असता ‘याचीचौकशी करायची की नाही ते बघू, पण पहिल्यांदा महिलांच्या अत्याचाराची चौकशी करू’, असे देखील त्यांनी सांगितले.
आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार
अशोक खरात याच्यासोबत काही अधिकाऱ्यांचे संबंध होते असे सांगितले जात आहे. त्या संबंधांमधून त्याने संपत्ती जमवली, जमिनी विकत घेतल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, खरातच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी होणार, असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.









