संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी मृत्यूबाबत राज्यभरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमागील कारणांबाबत विविध तर्क-वितर्क व्यक्त होत असून, घातपाताची शक्यता असल्याचीही चर्चा काही ठिकाणी रंगताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून जोर धरत आहे.
याच अनुषंगाने आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषद व विधानसभेत या गंभीर विषयावर तातडीने चर्चा घडवून आणावी, अशी ठाम मागणी केली आहे. अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात त्यांनी विधानभवनात अजित पवार यांचा फोटो हातात घेऊन प्रवेश केला. त्यानंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून त्यांनी आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
या आंदोलनाद्वारे “अजितदादांच्या मृत्यूमागील सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे आणि सध्या निर्माण झालेला संभ्रम दूर झाला पाहिजे,” असा ठाम संदेश त्यांनी दिला. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर आणि तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. मिटकरी यांनी पुढे सांगितले की, अशा संवेदनशील घटनेबाबत सरकारने मौन बाळगणे योग्य नाही.
जनतेच्या मनात निर्माण झालेल्या शंका दूर करण्यासाठी विधानमंडळात सविस्तर चर्चा होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळेच या विषयावर तातडीने चर्चा घेऊन सत्य परिस्थिती स्पष्ट करावी, अशी त्यांची भूमिका आहे. दरम्यान, या घटनेची गांभीर्य लक्षात घेता शासनाने त्वरित हस्तक्षेप करून या प्रकरणाची चौकशी सुरू करावी आणि निष्कर्ष पारदर्शकपणे जनतेसमोर मांडावेत, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.









