संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती- हॉटेल व्यवसायात व्यवस्थापक म्हणून काम करताना मालकाचा विश्वासघात करून 34 लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या आणि मागील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे.दत्तात्रय पोपटराव खुळे (रा. माळेगाव, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, अशी माहिती बारामती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय खुळे हा एका नामांकित हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. या काळात त्याने ग्राहकांची बनावट नावे नोंदवणे, उधारीचे खोटे हिशोब दाखवणे आणि आर्थिक व्यवहारात फेरफार करणे अशा प्रकारांचा अवलंब केला. या माध्यमातून त्याने एकूण 34 लाख 33 हजार 393 रुपयांचा अपहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सतत आपला ठावठिकाणा बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. त्यानुसार आरोपी खुळे हा माळेगाव परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले.
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक राऊत, सहायक फौजदार संदीप जाधव, हवालदार रामचंद्र शिंदे आणि पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांनी केली.
“गुन्हेगार कितीही चतुर असला तरी तो कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही,” असा संदेश या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे. अपहार झालेली रक्कम हस्तगत करण्यासाठी आरोपीची पोलीस कोठडीत सखोल चौकशी सुरू आहे. तसेच अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीबाबत नागरिकांनी सतर्क राहून तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









