बारामतीच्या वीज प्रश्नावर युगेंद्र पवार आक्रमक, सायंकाळी लोडशेडिंग थांबवण्याची ठाम मागणी


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असताना या प्रश्नावर आता राजकीय पातळीवरही आवाज उठू लागला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे युवा नेते युगेंद्र पवार यांनी आज पदाधिकाऱ्यांसह बारामती येथील ऊर्जा भवनात महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन वीजप्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी महावितरणचे बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांना सविस्तर निवेदन सादर करत विविध समस्यांकडे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील गावठाण फीडर आणि कृषीपंप वीजपुरवठ्यातील असमतोल, वारंवार होणारे लोडशेडिंग आणि विशेषतः सायंकाळच्या वेळेत करण्यात येणारे फोर्स लोडशेडिंग यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

परीक्षा कालावधी सुरू असताना सायंकाळच्या वेळेत वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शेतकऱ्यांना वेळेवर वीज उपलब्ध न झाल्याने पिकांना पाणी देणे कठीण होत असून, शेतीचे नियोजन कोलमडत असल्याचीही त्यांनी खंत व्यक्त केली.

खांडज, पणदरे, माळेगाव, ढेकळवाडी यांसह अनेक गावांमध्ये सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. सध्या शहर आणि ग्रामीण भागात सुरू असलेले अतिरिक्त चार तासांचे भारनियमन केवळ तांत्रिक समस्या न राहता नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे मोठे संकट बनले असल्याचे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.

सायंकाळच्या वेळेत वीज नसल्याने घरगुती कामे, जनावरांची देखभाल, दूध काढणे तसेच मुलांचा अभ्यास यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी केली.

“शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सातत्यपूर्ण आणि नियोजित वीजपुरवठा हा शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वीजपुरवठा स्थिर आणि विश्वासार्ह करण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत,”अशी ठाम भूमिका युगेंद्र पवार यांनी मांडली.

यावर मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत लवकरच आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील,असे आश्वासन दिले. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे बारामती तालुकाध्यक्ष ॲड. राजेंद्र जगताप, नगरपरिषद विरोधी पक्षनेत्या आरती शेंडगे-गव्हाळे, युवक शहराध्यक्ष ॲड.बळवंत बेलदार पाटील, युवक तालुकाध्यक्ष संदीप देवकाते, युवती शहराध्यक्षा राणी नवले, नितीन तावरे, पुणे जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष पैगंबर शेख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान,बारामतीतील वाढत्या वीज समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, प्रशासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय घेतला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!