पुण्यात अवकाळी पावसाने महिलेचा बळी, सावली देणारा झाडच काळ बनल


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

पुणे – पुण्यात मुसळधार अवकाळी पावसाने महिलेचा बळी घेतला आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे पुणे शहरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर झाडाखाली तिघेजण अडकल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यामुळे पुणे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांकडून झाडाखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करण्यात आले. या दरम्यान पुणे पोलिसांना दोघांना वाचवण्यात यश आलं. पण एक महिला जागीच दगावली आहे. रंजना नवनाथ गिरी असे मृत महिलेचे नाव आहे. पु ल देशपांडे उद्यानाजवळील नवश्या मारुती मंदिराजवळील सिंहगड रोड येथे संबंधित घटना घडली. दरम्यान, मुसळधार पावसात पोलिसांनी जीव धोक्यात घालून दोघांचे जीव वाचवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू होता. याच वेळी रस्त्यालगत असलेले मोठे झाड अचानक उन्मळून पडले. त्यावेळी त्या ठिकाणी उभे असलेले तिघे जण झाडाखाली अडकले. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांकडून बचावकार्य, पण महिलेचा मृत्यू

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. मोठ्या झाडाच्या फांद्या हटवून अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये दोन जणांना जिवंत बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. मात्र, रंजना नवनाथ गिरी या महिलेला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी केलेल्या बचावकार्याचं कौतुक

या घटनेत पोलिसांनी जीव धोक्यात घालून केलेल्या धाडसी बचावकार्याचे कौतुक होत आहे. अचानक कोसळलेल्या झाडामुळे अशा प्रकारची दुर्घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने धोकादायक झाडांची तपासणी करून तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पुणे महापालिका प्रशासन सतर्क

अवकाळी पावसामुळे शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मा. महापौर मंजुषा दीपक नागपूरे यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. महापौरांच्या निर्देशानुसार शहरातील झाडांची छाटणी, धोकादायक फांद्या हटविणे, तसेच नाल्यांची व गटारांची साफसफाई ही कामे तातडीने हाती घेण्यात येणार आहेत. पावसामुळे नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

यासोबतच आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच महानगरपालिकेच्या १ ते ५ परिमंडळातील उपायुक्तांना तत्काळ आणि प्रभावी कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महानगरपालिकेच्या संबंधित विभागांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!