संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – बारामतीत पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत महिलांची फसवणूक आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाला बारामती न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी आरोपी मिलिंद मदन जाधव (वय ५०, रा. धोपे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) याला जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये चार वर्षांची सक्तमजुरी आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
या प्रकरणात आरोपीने फिर्यादीसह इतर महिलांना ‘पैशांचा पाऊस पाडून देतो’ असे खोटे आमिष दाखवले होते. त्यासाठी अघोरी पूजेचे आयोजन करून महिलांना अनुचित पद्धतीने बसवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले. तसेच पूजेच्या नावाखाली आर्थिक फसवणूकही केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पीडित महिलांनी याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध शारीरिक अत्याचार, महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी केला असून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.
सरकार पक्षाच्या वतीने अॅड. ज्ञानदेव शिंगाडे यांनी युक्तिवाद करत सात साक्षीदारांची साक्ष नोंदवली. न्यायालयाने सर्व पुरावे ग्राह्य धरत आरोपीला दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली.









