बारामती पोटनिवडणूक: सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार अभिजीत कांबळे यांचा आक्षेप


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार अभिजीत कांबळे यांनी गंभीर आक्षेप नोंदवले.

छाननीदरम्यान झालेल्या सुनावणीत अभिजीत कांबळे यांनी आरोप केला की, सुनेत्रा पवार यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये काही महत्त्वाची आर्थिक माहिती आणि मालमत्तेचे तपशील लपवले आहेत. विशेषतः स्वर्गीय अजित पवार यांच्या नावावर असलेल्या सुमारे १२ कोटींच्या कर्जाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, असा त्यांचा दावा आहे.

याशिवाय, अयान मल्टी स्टेट कंपनीशी संबंधित कर्ज आणि त्या कंपनीतील आर्थिक व्यवहारांची माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद नसल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच पार्थ पवार यांच्या नावावरील मालमत्ता, ढेकळवाडी येथील जमिनीचे मूल्यांकन, तसेच इतर कुटुंबीयांच्या नावावरील कर्ज आणि संपत्तीचे तपशील लपवण्यात आल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.

सुनेत्रा पवार यांच्या वकिलांनी मात्र हे सर्व कर्ज कंपनीच्या नावावर असल्याने वैयक्तिक प्रतिज्ञापत्रात त्याचा समावेश करण्याची गरज नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
दरम्यान,निकाल विरोधात गेल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे अभिजीत कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाच्या निकालाकडे बारामतीतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून पुढील राजकीय घडामोडींसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!