बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसने घेतली माघार, निवडणूक बिनविरोध होणार का ?


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती पोटनिवडणुकीत अखेर मोठा उलटफेर झाला आहे. काँग्रेसने या निवडणुकीतून आपला उमेदवार मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

दिल्लीतील हायकमांडने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर काँग्रेसने हे पाऊल उचलल्याचे समजते. या निर्णयामुळे बारामतीमधील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले असून सुनेत्रा पवार यांच्यासमोर मुख्य राजकीय पक्षाचा उमेदवार रिंगणात नसल्याचे स्पष्ट झाले. अर्ज मागे घेण्याच्या एक तास आधीच काँग्रेसने हा निर्णय घेतला. शेवटच्या क्षणी दिल्ली ते बारामती व्हाया मुंबई वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवार माघारीचा निर्णय जाहीर केला.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस नेत्यांना केलेले फोन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी घेतलेली भेट फळाला आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेली ही निवडणूक अत्यंत भावनिक असल्याने, काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवार उभा करू नये, अशी विनंती पवार कुटुंबाकडून करण्यात आली होती. सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेणाऱ्या काँग्रेसने अखेर मित्रपक्षांच्या विनंतीला मान देत माघार घेण्याचे ठरवले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, रोहित पवार आज भल्यापहाटे आले आणि त्यांनी अजितदादांकरता तुमची कुठेतरी सहकार्याची भूमिका असूद्या अशी विनंती केली. इतकंच नाही तर तुमची मतं ही अजितदादांना श्रद्धांजली म्हणून द्या असंही ते म्हणाले. बारामतीमधून अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी देखील आपलं मत आणि आपल्या भावना आज व्यक्त केल्या. या सर्व गोष्टींसोबत महाराष्ट्रातील सर्व नेतृत्वांशी चर्चा झाल्यानंतर आम्ही एका निर्णयापर्यंत पोहोचलो असल्याचे त्यांनी म्हटले.

पण काँग्रेसने माघार घेतली असली तरी देखील  23 अर्ज अजून बाकी आहेत त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही असे चित्र दिसत आहे . पण मुख्य लढत नसल्यामुळे आता सुनेत्रा पवार यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!