संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – बारामती-भिगवण रोडवरील वंजारवाडी परिसरात असलेल्या अमृता लॉज (सोमनाथ हॉटेल) येथे सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर बारामती तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा भांडाफोड केला आहे. मध्यरात्री टाकलेल्या या छाप्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि उपनिरीक्षक रामहरी भोसले यांच्या पथकाने बोगस ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला. त्यानंतर लॉजवर छापा टाकण्यात आला.
छाप्यादरम्यान काही खोल्यांमध्ये महिला आणि ग्राहक एकत्र आढळून आले. चौकशीत आरोपी बाहेरून महिलांना आणून ग्राहकांना पुरवत असल्याचे उघड झाले. तसेच ग्राहकांकडून पैसे घेऊन आर्थिक फायदा घेत असल्याचेही समोर आले.
या प्रकरणात अजित जयसीन शेट्टी (वय ३८) आणि चाँद कलाम आलम (वय २०) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पश्चिम बंगाल येथील तीन आणि भिवंडी (मुंबई) येथील दोन अशा एकूण पाच महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना पुढील पुनर्वसनासाठी सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल फोन, कंडोम पाकिटे तसेच ग्राहकांची नोंद असलेले रजिस्टर असा सुमारे १७,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीपणे पार पडली आहे.








