संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
देशात वाढत्या डिजिटल फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर Reserve Bank of India (RBI) मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी RBI मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर ‘कूलिंग-ऑफ’ कालावधी लागू करण्याचा विचार करत आहे.
या प्रस्तावानुसार, ग्राहकांनी केलेले मोठे व्यवहार त्वरित पूर्ण न होता काही काळासाठी थांबवले जातील, ज्यामुळे फसवणूक टाळण्यास मदत होईल.
RBIच्या पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम्स विभागाने यासंदर्भात एक चर्चापत्र सादर केले असून त्यामध्ये डिजिटल पेमेंटमधील फसवणूक रोखण्यासाठी चार महत्त्वाचे पर्याय सुचवले आहेत. विशेषतः ₹10,000 पेक्षा जास्त रकमेचे खाते-ते-खाते व्यवहार एका तासासाठी होल्डवर ठेवण्याचा प्रस्ताव सर्वाधिक चर्चेत आहे. या कालावधीत ग्राहकांना व्यवहार रद्द करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे चूक किंवा फसवणूक झाल्यास नुकसान टाळता येईल.
आकडेवारीनुसार, डिजिटल फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नॅशनल सायबरक्राइम रिपोर्टिंग पोर्टलच्या माहितीनुसार, 2021 मध्ये सुमारे 2.6 लाख प्रकरणे (₹551 कोटी) होती, जी 2025 पर्यंत वाढून 2.8 लाख प्रकरणे (₹22,931 कोटी) झाली आहेत. यावरून डिजिटल व्यवहारांमधील धोका किती वाढला आहे, हे स्पष्ट होते.RBIच्या विश्लेषणानुसार, ₹10,000 पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार एकूण व्यवहारांपैकी केवळ 45% असले तरी, फसवणुकीच्या प्रकरणांपैकी तब्बल 98.5 टक्के या व्यवहारांशी संबंधित आहेत. त्यामुळे मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.








