बारामतीत अजित पवारांच्या आठवणीत मतदान; सुनेत्रा पवार भावुक, काय म्हणाल्या ?


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – (ता.23) बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडत असून, या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर माध्यमांशी बोलताना त्या भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

यावेळी त्यांनी अजित पवार यांची आठवण काढत सांगितलं की, “अजितदादांना श्रद्धांजली म्हणूनच बारामतीकर मतदानासाठी बाहेर पडत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी बारामतीसाठी जे काम केलं, ते जनतेला चांगलं माहित आहे. दादांशिवाय काम करण्याची सवय नाही, पण आता ते आपल्यात नाहीत, ही वस्तुस्थिती स्वीकारावी लागेल.” त्यांच्या या वक्तव्यामुळे वातावरण अधिकच भावनिक झालं.

सुनेत्रा पवार यांनी पुढे सांगितलं की, गेल्या साठ वर्षांपासून बारामतीची जनता पवार कुटुंबासोबत ठामपणे उभी आहे. ही निवडणूक आता बारामतीकरांनी स्वतःच्या हाती घेतली असून, जरी उत्साह कमी असला तरी कर्तव्य म्हणून नागरिक मतदानासाठी पुढे येत आहेत. अजितदादांनी केलेल्या कामाची जाणीव ठेवून मतदार आपलं मौल्यवान मत देत आहेत, असं त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, अजित पवारांची आई यांनीही ८९ व्या वर्षी घरातूनच मतदानाचा हक्क बजावला. तसेच शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचं सांगत, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते मतदानासाठी उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली.

याचबरोबर, अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनीही मतदान केल्यानंतर प्रतिक्रिया दिली. “बारामतीकरांनी ही निवडणूक मनावर घेतली आहे. मोठ्या प्रमाणात मतदान होत असल्याचं दिसत असून, चांगल्या मताधिक्क्याने विजय मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच बिनविरोध निवडणुकीसाठी २० ते २३ उमेदवारांनी माघार घेतल्याचं सांगत, कुणीही पैशांची मागणी केली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

आता सुनेत्रावहिनी निवडणूक लढवत असल्या तरी 2029 मध्ये तुम्ही उमेदवार असाल या प्रश्नावर सुद्धा जय पवार यांनी उत्तर दिलं. “2029 मध्ये मला उमेदवारी मिळावी ही लोकांची मागणी आहे. पण मी एक छोटा कार्यकर्ता आहे. तसचं काम सुरु ठेवेन. मी उमेदवार व्हावा ही लोकांची मागणी आहे, माझी नाही” असं जय पवार बोलले.

एकूणच, अजित पवार यांच्या निधनानंतर होणारी ही पोटनिवडणूक भावनिक पार्श्वभूमीवर पार पडत असून, बारामतीकरांचा प्रतिसाद आणि मतदानाची टक्केवारी याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!