संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील पाचगणीजवळच्या दरे गावचे रहिवासी. या गावापासून जवळच असलेल्या सावरी येथे मुंबई पोलीसांनी सुमारे ११५ कोटी रूपयांचा ४५ किलो ड्रग्सचा साठा जप्त केला.
पोलीसांनी धाड टाकलेले ‘हॉटेल तेज यश’ हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या मालकिचे. या हॉटेलचा व्यवसाय दरे गावचे सरपंच रणजीत शिंदे सांभाळतात. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दबावामुळे या प्रकरणात कारवाई होत नसल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
संसदेत आणि विधीमंडळाच्या अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार ही मागणी करणार असल्याची माहिती शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भुमिका घेतल्याने या प्रकरणाची चौकशी निपष्कपणे होणार का? या प्रकरणाचे धागेदोरेे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचणीत आणाणार का?, असा सवाल उपस्थित होत आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या,’पाचगणी हे राज्यातील महत्वाचे पर्यटन स्थळ आहे. मात्र, पाचगणीचा परिसर अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे पाचगणीमध्ये ‘तेज यश’ नावाचे हॉटेल चालवतात. काही काळापासून या हॉटेलचा व्ययवसाय रणजीत शिंदे पाहत आहेत. या हॉटलेवर पोलीसांनी ११५ कोटी रूपयांचा ४५ किलो ड्रग्स साठा जप्त केला होता. त्यानंतर प्रकाश शिंदे यांनी हॉटलेशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगून सगळे आरोप फेटाळले. मात्र, प्रकाश शिंदे हे खोटे बोलत आहेत. हॉटेलचे ऑनलाईन बुकिंग प्रकाश शिंदे हेच घेत असून, त्यांचे नाव, मोबाईल क्रमांक त्याठिकाणी आहे. त्यांनी दरे गावचे सरपंच रणजीत शिंदे फरार का झाला, हे सांगावे.”या प्रकरणात पदाचा दुरुपयोग करून तपास यंत्रणावर दबाव टाकला जात आहे. राज्यातील मुले ड्रग नावाखाली देशोधडीला लावले जात आहे, ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे,’ असेही शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले.
तर दुसरीकड प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या राज्यात निवडणुका सुरू आहेत, नगर पालिकेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी निर्माण करण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न आहे, असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे, तसेच अंधारे यांनी माफी न मागितल्यास कारवाईचा इशारा देखील शंभुराज देसाई यांच्याकडून देण्यात आला आहे..
या प्रकरणावर माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे म्हणाले की आमच्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत. सनसनाटी निर्माण करून शिंदे कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमच्या कुटुंबाला बदनाम करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावणार आहे. तसेच आरोप मागे न घेतल्यास अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ते असेही म्हणाले की सातारा जिल्ह्यातील तो कारखाना आणि ती जमीन आपली नाही.. माझ्या जमिनीचा सातबारा गट १७ / १ अ असा असून छापा पडलेल्या जमिनीचा गट ४/१ असा आहे. तर शिंदे कुटुंबियांच्या ज्या जमिनीचा उल्लेख विरोधकांनी केला ती जमीन योगायोगाने नव्हे तर वडिलोपार्जित असल्याने आमच्याकडे आली आहे. या जमिनीचा गट क्रमांक ३०/१० असा आहे. तसेच छापा पडलेल्या ठिकाणापासून ती १५ ते १६ किलोमीटर लांब आहे.. ही जागा रणजीत शिंदे याला विकण्यात आली असून त्याची कागदपत्रे आमच्याकडे आहेत. तसेच रणजीत हा फरार झाला नसून गावातच आहे. पोलिसांच्या एफआयआरमध्ये कुठेही रणजीत शिंदे याच्या नावाचा उल्लेख नाही. अस ते म्हणाले.. तसेच या गुन्ह्यात त्याचा कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
तर आता या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली याप्रकरणात विरोधक एकनाथ शिंदे यांचे नाव जाणीवपूर्वक गोवत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते म्हणाले “साताऱ्यात पोलिसांनी धाड टाकून ड्रग्जचा इतका मोठा साठा जप्त केला, त्यासाठी मी सर्वप्रथम पोलीस दलाचे अभिनंदन करतो. जो धंदा चालला होता, त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला. या प्रकरणात जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेंचं नाव आणण्याचा प्रयत्न चुकीचा आहे, अयोग्य आहे, निषेर्धाह आहे. आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यात एकनाथ शिंदे यांच्या परिवाराचा संबंध दुरावन्याने आढळून आलेला नाही. आम्ही याप्रकरणाची पूर्ण चौकशी करत आहोत” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच या प्रकरणाबद्दल एकनाथ शिंदे यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही ते काय बोलणार याची सगळेच वाट बघत आहेत..
एकूणच, १४५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, हे प्रकरण केवळ आरोप-प्रत्यारोपांपुरतं मर्यादित न राहता सत्तेच्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचलं आहे. पोलिस तपासातून नेमकं काय सत्य समोर येतं आणि या गंभीर आरोपांवर सरकार काय भूमिका घेतं, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.









